ऐक बाई ! मी स्वप्न पाहिले, संत गजानन !
(चाल -दैष्णव जन तो तेने कहिवये...)
ऐक बाई ! मी स्वप्न पाहिले, संत गजानन ! डोळा वो ।
नग्न रुप अति विशाल त्यांचे, जणू शंकरची भोळा ! वो ।।धृ0।।
करी धरुनिया चिलिम, आसनी बसले सहज समाधी वो ।
उन्मनि त्यांची मुद्रा बघुनी, चरणी मस्तक वंदी वो ! ।।१।।
सगुण रुपाचा संत बोलला, कलियुग आता भरले वो ।
म्हणुनि सांगतो निरुपाधीने, जीवन कंठा अपुले वो ।।२।।
नाम भजे जो सदा गजानन ! संकट त्यांचे टळती वो ।
पूर्व - जन्मीचे पातक सगळे, दाहि दिशेने जळती वो ।।३।।
स्त्री - पुरुषाने व्रत हे घ्यावे, दानधर्म निष्ठेचे वो ।
तुकड्यादास म्हणे, मग जाती ! पाप मूळ दृष्टीचे वो ।।४।।