गजानन ! नाम स्मरतांना, कृपेची धार ओलावे
(चाल -लगाले प्रेम ईश्वर से...)
गजानन ! नाम स्मरतांना, कृपेची धार ओलावे ।
पाहणे हे जया वाटे, तयाने संत गुण गावे ।।धृ0।।
जयाचे तीर्थ घेतांना, मरतसे जागले लोकी ।
तयाची कीर्ति ही ऐसी, गजानन-विजय शोधावे ।।१।।
धन्य हा संत शेगावी, प्रगटला भक्त ताराया ।
अजब दावूनिया माया, लोक निज भक्तिसी लावे ।।२।।
कुणाला मुक्तिचा प्रेमा, कुणाला भक्तिचा नेमा ।
कुणाच्या पूर्ण मनकामा, करितसे जो स्मरे भावे ।।३।।
म्हणे तुकड्या न आम्हांसी, चाड या मोहपाशाची ।
कृपा करिती गजानन ! हे, तरिच निज ज्ञान ते पावे ।।४।।