ज्ञान-दीप हा विद्यार्थ्याचा, वऱ्हाडचा हरपला ।
(डॉ. पंजाबराव देशमुख यांना निधनोपरांत वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी
महाराजांनी वाहिलेली गीत श्रद्धांजली )
(चाल- कृषकाची प्रिय हृद्य देवता...)
ज्ञान-दीप हा विद्यार्थ्याचा, वऱ्हाडचा हरपला ।
अरे, हा थोर पुरुष लोपला ।।धृ0।।
अखिल विश्व कृषकांचा योजक,अम्हास का विसरला ।
समाजातूनी ध्वनि गर्जला ।।
जनसाधारण, लोकहिताचा, प्राण पणा लागला ।
अजुनि नच ग्रंथ पूर्ण वाचला ।।
चाल : ज्या लोकहिताची आकांक्षा बावरी ।
शिक्षणास सारी वेळचि अर्पण करी ।
पक्ष्यासम सेवेसाठी घिरट्या भरी ।
छत्रपतीची ध्वजा घेऊनी, नन्दादिपि उजळला ।
हजारो ग्रामाशी चमकला ।।१।।
वऱ्हाडात का, भारतातही, परदेशी जाऊनी ।
शिकविले तरुण मुले धावुनी ।।
दारिद्रयाचे पांग फेडले, शिक्षणास देउनी ।
गर्व हा तुमचा सगळ्या मनी ।।
चाल : साथीस घेऊनी मित्र सत्र वाढवी ।
ज्ञानार्जन - यज्ञे गाव - गाव चालवी ।
सर्वावरी करुनी प्रेम पक्ष मालवी ।
निर्भयतेने विद्यापीठा, स्थापन करण्या खुला ।
विनंती - अर्ज तुझा धडकला ।।२।।
अमरावती नगरास शिवाजी -शिक्षा-स्थळ बनवुनी।
दाविले परमधाम सजवुनी ।।
भू - वैकुंठापरी दिसतसे, संस्था पाहता क्षणी ।
कलेने भरली चहबाजूनी ।।
चाल : अति थोर-थोर तरुणास अडवुनी धरी ।
धन - धान्य मागुनी करी संस्था साजिरी ।
सेवेस लाविली तसूण - पिढी ही बरी ।
कोण विसरी या तुझ्या गुणांना, धर्मपत्नि अन् मुला-।
याचि सेवेला तू वाहिला ! ।।३।।
अतिकष्टाने जीवन जगवुनी, त्याग-तपस्या करी ।
बहुजन जनता उन्नत करी ।।
चाल: शासनात बसुनी शेतकरी जगविला ।
कृषकांचा मेळा दिल्लीला चमकला ।
तुकड्या म्हणे - पंजाबराव श्री, यश -कीर्ती पावला ।
विसरी ना भारत तव शक्तिला ।।४।।
- श्रीगुरुदेव मासिक मे १९६५