उगिच का बरळता ऐसे ? बघितल्यावीण संताशी
(चाल- प्रभू हा खेळ दुनियेचा...)
उगिच का बरळता ऐसे ? बघितल्यावीण संताशी ।
कळे कोणास वैभव ते ? ओतल्या जरीही धनराशी ।।धृ0।।
अवलिया संत ! शेगावी, राहतो सांगती ऐसे ।
पहातरि एकदा तेथे, जाऊनी मौज ती कैसी ! ।।१।।
हजारो लोक भक्तीने, लोळती नाव घेवोनी ।
भेटतो-पावतो त्यासी, ऐकिली कीर्ति ही ऐसी ।।२।।
किती तरी भव्य मंदिर हे, गमे जणु राजवाडाची ।
वरी श्रीराम मंदिर हे, समाधी आत संताची ।।३।।
ज्ञान घ्या, ध्यान घ्या कोणी, भक्ति घ्या, मुक्ति घ्या कोणी ।
म्हणे तुकड्या दिसे तेसा, भावना हो जशी- तैसी ।।४।।