वाहवा रे ! धनलोभी जनहो !
(चाल: का मनि धरिली अढी विठोबा...)
वाहवा रे ! धनलोभी जनहो !
माया तुमची भली !
काळ पडे गावांत,तरी कोणा न अधोली दिली ।।धृ0।।
घरी ठेवली, कुजू लागली,
पेवामधि घातली ।
मरती जन हे बघुनिहि डोळा, जरा न त्यांना दिली ।।१ ।।
वास लागला पेवामाजी,
पाण्याने वाहविली ।
तरी बिना पैश्यांनी कैसे ! अशी रुची वाढली ।।२।।
देवाने हे धान्य तुला जे,
दिधिले ठेवावया ।
अर्थ तयाचा असा नसे,कुणि मरोन करि तू दया ।।३।।
राष्ट्रधनाचे सर्वचि वाली,
का न जाणशी गड्या !
न्याये करि धनसंचय, सुमने खर्च करी बापुड्या ! ।।४।।
अपुला परका भेद पहाया,
दिले तुम्हा नच धना ।
तुकड्यादास म्हणे बंधूनो ! सकल आमुचे म्हणा ।।५।।