जमिन देऊनि सर्व तुम्हाला काय भीक मागावी अम्ही ?
(चाल : उठा गड्या अरुणोदय झाला...)
जमिन देऊनि सर्व तुम्हाला काय भीक मागावी अम्ही ?
मुलास शिक्षण, आम्हास भोजन कोण घेइ मग याची हमी ।।धृ0।।
स्वामि म्हणुनिया तुम्हीच करता, मजा जमीनीवर अमुच्या ।
य़ा हो या भू-दान मंडळी ! शंका द्या निरसुनि साच्या ।।१।।
धरे-अमीनी घरासहित घ्या, मुलासहीत आम्ही येतो।
सर्व उन्नति करा आमुची, तोंडी का ? लेखी देतो !! ।।२।।
नाहि तरी घेऊनि जमीनी, अशी फजीती नका करू ।
सांगा संत विनोबालाही, दुःखी होऊनि अम्ही मरू ।।३।।
तुकड्यादास म्हणे ही कहाणी, कितितरी लोकांनी वदली ।
आजवरी त्या गरीब जनांची, कदर तशी का ना कळली ?।।४।।
- मुंबई, २८-0७-१९५३