तीर्थ करायला कशाला लागला ?
(चाल: भूमिदानाचं वेड कसं लागल !...)
तीर्थ करायला कशाला लागला ? देव पूजायला कशाला लागला ।।धृ0।।
घरी जमीन असून, नाहि दिलं भूदान, अंगी पैशांचा तान ।
नाहि संताशी विनयाने वागला ।। देव0 ।।१।।
करतो काळाबाजार,अवघा खोटा व्यापार, बोलतो असत्य फार ।
हे सोडून राहा जगि चांगला ।। देव0 ।।२।।
जातो पंढरपुरात, थूंकि टाकतो मार्गात, नाहि भजनाला जात ।
हाटि सामान घेण्यात रंगला ।। देव0 ।।३।।
सांगतो अपुल्या गावी पुण्य करण्या जाई तेथे आठव नाही ।
जाऊन सीनेमा-तमाशा पाहिला ।। देव0 ।।४।।
कर्ज करितो घरी, जाण्या तीर्थावरी,घेऊन चाकू-सुरी ।
खिसे कापाया बेईमानी शिकला ।। देव0 ।।५।।
नाहि ऐकत किर्तन, सारं विषयात मन, जातो मेळा घेऊन ।
नाहि धड कुणाशि कधि वागला ।। देव0 ।।६।।
दारु-गांजा पिऊन, बसतो अपुला झिंगुन, गप्पा मारतो रंगून !
करतो सेवा करणाऱ्यांच्या टिंगला ।। देव0।।७।।
पाप-कर्मासि सोड, धरि तीर्थाचि जोड, मागची सोडुन खोड ।
तरी पावेल गुरुदेव आपुला ।। देव0 ।।८।।
ऐक तुकड्याची हाक,मानु नकोस राग, सगळ्या जनतेला सांग ।
पाय विचारानं टाक गड्या आपुला।। देव0।।९।।
पंढरपुर दि. २४-0७-१९५३