ऊठ ऊठ भारता ! आळसी होऊनि

(चाल: रक्ष रक्ष ईश्वरा भारता...)
ऊठ ऊठ भारता ! आळसी होउनि का बसला ?
महाक्रांतिचा सूर्य-भूमियज्ञ, हा सुरू  झाला ।।धृ0।।
चहुबाजूंनी उदारतेची, दिव्य  लाट  उठली ।
भूमिदान देण्या भूस्वामी, यांचि गर्दि झाली ।।१।।
नको अधिक भूमि ही दोष हा सगळ्यांना कळला ।
भूदानाचा, धनदानाचा, समुद्र खळवळला ।।२।।
गरीब शेतकरी-मजुरांचे ही, हृद्य भरुनि आले ।
बहु दिवसांचे कष्ट आमुचे, म्हणति सफल झाले ।।३।।
ग्रामीण उद्योगास चालना, सहज मिळो आली ।
प्रसन्न खेडी   दिसू   लागली, आनंदे   भरली ।।४।।
कष्ट करुनिया जगू सर्वही, उज्वल करू देशा ।
तुकड्यादास म्हणे प्रार्थू ! त्या अनंत परमेशा।।५।।
                                       मुदखेड, दि.११-०७-१९५३