लोकशाहीचे पोवाडे
ऐका ऐका सगळे गावकरी ! पुरुष आणि नारी !
भारत स्वतंत्र झाला अपुला ।
नाही आता हक्क दुजा उरला ।
दिल्लीचा तक्त तुमचा झाला रे, जी 0।।धृ0।।
सावधान रहा सर्वही, पचविण्यास ही,
सत्ता गांधीच्या तपस्येची ।
शेकडो बळि गेले त्यांची ।
लाज राखा त्या शहीदांची रे, जी 0।।
देशभक्तांनी लाविले पण, झाले कुर्बान,
पर्वा नाहि केली रे प्राणांची ।
धनाची आणिक मानाची ।
तोडली बेडी मायभूची रे, जी 0।।
(अंतरा) ही झाली मागची वार्ता ।
ऐकता वाटे शांतता ।
आनंद न मावे चित्ता ।
जाहली वाटे पूर्णता ।
अरे देश आला हातात, गमविला त्यात,
हिरा हा अमोल किमतीचा ।
पूज्य गांधीजी देव अमुचा ।
विसर हा कसा पडला त्याचा रे, जी 0।।१।।
स्वातंत्र्य तई हे पुरं, लोक भराभर,
जाणतिल शजकारणासी ।
लिहीता येईल सर्वांची ।
कोणि ना गुलाम या देशी रे, जी0।।
खेडे गाव नंदनवन, राहील बनून,
तंगी नाही अन्ना पाण्याची ।
सोय होईल जीवनाची ।
दिवाळी सारखी सर्वांची रे, जी0।।
करतील कमाई सारे, इमाने इतबारे,
स्नेह सर्वाशिच सर्वांचा !
भेद नाहि उरला जातिचा ।
प्रगटला धर्म मानवांचा रे, जी0।।
(अंतरा) अति सुंदर राहणी आली ।
साफ गल्लि गल्लि ही झाली ।
ना दिसे कुणाची नाली ।
स्वच्छता घरोघर फुलली ।
जन दिशेस जाती दुर, करूनिया चर,
लावती खत हे शेतीला ।
दुर्गधी नाहिच गावाला ।
असे सुख मिळो भारताला रे, जी0।।२।।
सहकार करूनि सर्वही, धना सगळेहि,
मिळवूनी करतिल व्यापार ।
मुनाफा सगळ्यांना सारा ।
दलाला-वकिला नाही थारा रे, जी0।।
खरं-खोटं ठावूक गावाला,खर्च कशाला?
कचेरी - कोर्ट गरज काय ?
करू आम्ही गावोगावी न्याय ।
होऊ ना देउच अन्याय रे, जी 0।।
असा दिवस निघेल भारता,तइंच पूर्णता,
झालि आम्ही समजू स्वराज्याची ।
आज दर्गतिच गरीबाची ।
पर्वा नाही कुणास कोणाची रे, जी 0।।
(अंतरा) हे राज्य असे गरिबांचे ।
कष्टतील जे जे त्यांचे ।
समता हे बीज सुखाचे ।
सारखे हक्क सर्वांचे ।
हे वचन असे गांधीचे, कराया साचे,
जबाबदारी आहे जनतेची ।
चला रे करू कती साची ।
कानि घ्या हाक ही तुकड्याची रे, जी0।।३।।
नागपूर , दि. १४-१२-१९४५