काय भजन ऐकता मौजेने -- पोवाडा
काय भजन ऐकता मौजेने, डुलवुनी मान,
भान सोडून शरीराचे ।
किती जण आहात कामाचे व्हावया सैनिक देशाचे रे, जी 0।।धृ0।।
आता दिवस नाही झोपायचे ।
आळसी पडून राहायचे ।
नाहि गांजा दारूही प्यायचे ।
गावात झगडे उठवायचे ।
कार्यास लागा तरूण हो ! उचलुनी बाहो,
शिपाई बना देशासाठी ।
पाडु नका आपसात गाठी ।
वेळ बाणीची आहे मोठी रे, जी0।।१।।
शेतीला चालना द्यावी ।
बहु धान्य ज्वारी पिकवावी ।
लावावे बागायत गावी ।
गायिगुरे मस्त बनवावी ।
शरीराचे धडधाकट, रहा राकट,
कष्ट करण्यास कुटुंबाचे ।
गावचे, आणिक देशाचे ।
तरिच या सार्थक भजनाचे रे, जी0।।२।।
(अंतरा) कर्तव्यान मुली, पोर ।
व्यायाम करा सान - थोर ।
करू नका चोरी-चहाडी, कुणाची काडी-
उचलनी आणु नका दारी ।
बघु नका दुश्चित परनारी ।
नष्टवा गुंडगिरी सारी रे, जी0।।३।।
(अंतरा) गावाचं संघटन साधा ।
ना कधी येई मग बाधा ।
लावुनी खांद्याशी खांदा ।
धनधान्ये घरोघर नांदा ।
कापूस गावि वटवून, सरकी काढून,
रूईला घ्या चरख्यावरती ।
सूत काढून अपुल्या हाती ।
विणुन घ्या कपडा देहाती रे, जी0।।४।।
(अंतर) चारित्र्यवान व्हा सारे ।
व्हा शुरवीर, गुणी व्हा रे ।
देशाचे भरवनी वारे ।
तरूण हो ! कामी लागा रे ।
हा सार आहे भजनाचा अमुच्या मनाचा,
ऐकुनी व्हा सावध आता ।
कानी घ्या तुकड्याची वार्ता ।
नाही तर फजित व्हाल पुढता रे,जी0।।५।।