जसे दिसता पहायला बरे, वरुनि साजिरे - पोवाडा

जसे दिसता पहायला बरे, वरुनि साजिरे,
अंगिच्या केसा - कपड्यांनी ।
पायिच्या वहाणा- जोड्यांनी ।
गेलं काय सांगा तुम्हामधुनी ? रे, जी 0।।धृ0।।
तोंडाला उदासी आली, काळिमा पसरली
पोकळी झाली छातीची ।
गळाली ताकद हाताची ।
दिसे जणु पुतळी मातीची रे, जी0।।१।।
हृदयात दिसेना धमक, नेत्रि ना चमक
तेज लोपले, स्फूर्ति गेली ।
बंधूता, एकी नसे  उरली ।
निराशा सर्व जनी भरली रे, जी0।।२।।
गावात दिसे अवकळा, शेत अन मळा,
दिसती हे स्मशानवत् सारे ।
हाडे जणू उरली गुरेढोरे ।
वाहती  दु:खाचेचि  वारे  रे, जी0।।३।।
नाही निसर्गाचा आधार, कुणी न दे थार,
न॑ दे सरकार साथ ज्यांना ।
भरवसा कवणाचा त्यांना ?
अशी मग कां न व्हावि दैना रे, जी0।।४।।
सुखि-शांत रामराज्याचा, ग्रामराज्याचा,
पुरस्कार गांधीजीनी केला ।
मुळातुन खेडि सुधरण्याला ।
आज पण मानि कोण त्याला रे, जी0।।५।।
गावोगावी वीज येणार, यंत्र घेणार,
उजळतील दिवे  भांडवलदार ।
नवनवी स्कीम काहि सरकार ।
चालले होत  लोक  बेकार    रे, जी0।।६।।
पदोपदी लाचलूचपती, वाढली अति,
काळाबाजार, चोरव्यापार ।
पापाचं धन शिकवी व्यभिचार ।
वाढले शोक, व्यसन, शृंगार रे, जी0।।७।।
धन - कैफ, स्वेर शिक्षण, तोडि बंधन,
नीति भाजून खाल्ली यांनी ।
तसाच गरिबांचा जठराग्नि ।
कोठवर ठेवि नेकी जपुनी? रे, जी ।।८।।
गावोगावी दिसे गोंधळ, राष्ट्र आंधळ,
कळेना मार्गि कुण्या जाई ।
धुंद जाहल्या दिशा दाही ।
निराशा पुढे उभी   राही   रे, जी0।।९।।
बसू विचार करण्या जरा, प्रभूला स्मरा,
एक होऊन मार्ग शोधा ।
आठवा थोरांचा  बोधा ।
ग्राम-उद्धार आधि साधा रे, जी0।।१0।।
गाव हे राष्ट्राचा पाया, किसान-मजुरा या,
सुधारुनि कष्ट दूर सारा ।
स्वावलंबीचा मार्ग सुधरा ।
भरूं द्या आधी यांच्या उदरा रे, जी0।।११।।
सत्य न्याय नीती खरी, स्थापुनी बरी,
होउं द्या सुखी पुढे चाला ।
ऐका तुकड्याच्या विनंतीला रे, जी0।।१२।।
                                   अमसवती, दि.१५-0८-१९४९