हाय हाय सर्व लोकाला -- पोवाडा

हाय हाय सर्व लोकाला, गरिब-अमिराला
शेतकरी - मजूर  ओरडतो ।
सरकार अधिक कर्ज घेतो ।
सांगा मग पैसा कुठ जातो? रे, जी0।।धृ0।।
काय झालं देशाचं कमी? उदास मायभूमि,
हर्ष - आनंद  नाहि    कोणा ।
चिंतातुर जो तो दिसे नयन ! ।
शहाणा असून खाया मिळेना रे, जी0।।१।।
एक गाव नाहि असं सुनं, पुढाऱ्यावीण,
असे असुनिया झगडे दिसती ।
गावोगावी पक्ष किती  असती ।
मधातील लोक फजीत होती रे, जी0।।२।।
काय आला उलटा जमाना, कोणि सांगाना-
काय केलं पाहिजे यशासाठी?
गावासाठी नि देशासाठी?
माणूसकी उरली नाही पोटी रे, जी0।।३।।
नाहि बंधूभाव राहिला, थाटला भला,
स्वार्थ हा ज्या त्या मार्गानं !
लुटाया बघति  सर्व  जाणं ।
ठगावर ठग  आले   मिळून  रे, जी0।।४।।
बहू बोलणार पंडित, मुका फजीत,
कोणि नाहि  साथ   सत्यतेला ।
गावोगावि हाल असा दिसला ।
अनुभव सर्व जना   आला  रे, जी0।।५।।
झालि दृष्टि वेडीवाकडी, बिघडली घडी,
तरूण हे शान करूनि फिरती ।
घरी   राहिली    पडित   शेती ।
स्त्रिया गोशात जीव देती  रे, जी0।।६।।
मुला शाळेमध्ये घातले, कॉलेजात गेले,
खर्च ना   पुरे   हौस  मोठी ।
विकले मग शेत मुलासाठी ।
पैसा नाही उरला पोटिपाठी रे,जी0।।७।।
नाही न्यायनीति राहिली, चरित्रे गेली,
भरवसा ठेवा कुणावरती?
आपणसहित एका पंक्ती ।
विरळे कुणि देवभक्त असती रे, जी0।।८।।
देशात जन्म घेऊनी, पुज्य गांधीनी,
फेडले ऋण लोकांवरचे ।
दिले हे दान स्वातंत्र्याचे ।
घेतले प्राण  आम्ही  त्याचे  रे, जी0।।९।।
असं झालं आमुच्या देशात, सत्य ही मात,
बोललो सावधान व्हाया ।
पुढे   तारणार   प्रभूराया ।
सर्व ही त्याची कला-माया रे, जी0।।१0।।
सर्व हे ठीक व्हावया, सांगतो उपाया,
लक्ष देऊनि ऐका   कानी ।
प्रार्थना सोडु नका कोणी ।
परस्पर प्रेम वाढे म्हणुनि रे, जी0।।११।।
असा आहे आमुचा अनुभव, बुद्धिला जीव-
पुढे मग कार्य सुधरण्याला ।
लागेना वेळ काहि  त्याला ।
ऐका तुकड्याच्या सत्य बोला रे, जी0।।१२।।
                                     - नागपूर, दि.१६-१२-१९४९