ऐका ऐका राज्याचे धनी -- पोवाडा
ऐका ऐका राज्याचे धनी ! ज्ञान घेऊनी,
राष्ट्राच्या नव्या निर्मितीला ।
हातभार लावा आप-अपुला ।
रामराज्याचा बांधू किल्ला रे, जी जी0।।धृ0।।
झाल्या गोष्टी आजवर फार, कोण करणार?
गटांचा गोंधळ, पक्ष अपार ।
न उरला माणुसकीला थार ।
नाहि गरिबांना कुठे आधार ।
झाले हे लोक किती बेजार रे, जी जी0।।१।।
कर्तव्य सर्व विसरले, स्वार्थवश झाले,
वशीलेबाजीचाच अंधार ।
नाहि सत्याला कुठे आधार ।
हाति सत्ता तो मजा करणार
कसे मग लोकगज्य कळणार रे,जी जी0।।२।।
घरोघरी झाले पढारी, देशाचे अरी,
स्वार्थाच्याभरी पापे करणार ।
सत्ता मिळवाया पुढे धजणार ।
गोड थापा नि द्रव्य देणार ।
इलेक्शन जणू काळाबाजार ! रे, जी0।।३।।
कुत्र्यापरी भांडली सारी, भाऊ भावावरी,
करिती हे वार स्वार्थापायी ।
अमानुष करिती कारवाई न्यायनीतीचा पत्ता नाही ।
देश का याने सुखी होई ? रे, जी 0।।४।।
असे स्वार्थ भक्त निवडूनी, दिली जरि कुणी,
राष्ट्राची हानिच ते करणार ।
लोकांच्या कष्टाबरि चरणार ।
कोण जनतेची भीड धरणारा ।
किसान-कामगार भुके मरणार रे, जी0।।५।।
करितील पास कायदे, बघुनी फायदे,
वायदे धूळ खात पडणार ।
सत्याचा आवाज करिल तो ठार ।
चिरडतिल जनास बेदरकार ।
कसले मग लोकशाही सरकार? रे, जी0।।६।।
सरकार म्हणजे जनमत, सेवेच व्रत ।
तुमच्या इच्छांची मूर्ति साकार ।
तुमच्या निवडीचा दिव्य आकार ।
नीतिन्यायाची सत्ता दिलदार ।
तुमच्या शक्तीचाच आविष्कार रे, जी0।।७।।
भवितव्य तुमच्या हातात, तुमचं बहुमत-
हेच होणार उद्या सरकार ।
म्हणूनि मतदान जपुनि द्या फार ।
नाहितर उलटे ही तरवार ।
तुमच्या तुमच्यावर होईल वार रे, जी0।।८।।
लोकशाही राज्य हे झाले, मतांनी चाले-
तुमच्या येथला राज्यकारभार ।
सत्ता ही तुमची, तुम्ही सरकार ।
उगिच मग का होता लाचार ?
ओळखा हक्क आणि अधिकार रे, जी0।।९।।
कर्तव्य आपुले करा, शिकवा इतरा,
सत्य नेत्यांना देऊनि आधार ।
हटवा दारिद्र्य, जुलूम, अंधार ।
कराया राष्ट्राचा उद्धार ।
प्रचारक व्हा सोडुनि घरदार रे, जी0।।१0।।
श्रीमंत, सुशिक्षित जन, बुवा विव्दान,
पुढारी, शिक्षक, कीर्तनकार ।
लोकशाहीर, किसान-कामगार ।
ऐका तुकड्याची हाक झनकार ।
यशस्वी करा लोकसरकार ।
लोकशाहीचाच जयजयकार रे, जी0।।११।।
गुरुकुंज, दि.२६-१-१९५0