व्हा सावधान लोकहो ! उभारुनि बाहो --पोवाडा

व्हा सावधान लोकहो ! उभारूनि बाहो,
देशाचे भवितव्य   ठरणार ।
पुढारीं दारोदारी फिरणार ।
तुम्हि मतदान कुणा करणार हो, जी0।।धृ0।।
कवणाच्या धाकदडपणे अथवा लोभाने,
पैशाने  भाळून   का    जाणार ?
जातिंचा म्हणून बळी पडणार ?
सांगा तर काय काय करणार ?
आज भुलूनि का उद्या रडणार ? हो, जी0।।१।।
लोकात पक्ष निर्मुमी, भेद पाडुनी,
गावा-गावांत भोग शिरणार ।
शेतकरी - मजूरची मरणार ।
पुढारी   आशीर्वाद    देणार ।
तुम्ही नाहि का हे ओळखणार? हो, जी0।।२।।
तम्ही हक्कदार येथेचे, लोक कोणचे-
भले आणि गुंड तुम्हा कळणार ।
समजुनी कराल  ना   व्यवहार ?
भूल-थापात, नाहि फसणार ।
असा मनि धराल का निर्धार ! हो, जी0।।३।।
नाही पक्ष माझियापुढे, खडे रोकडे,
बोल हे तुम्हापुढे धरणार ।
फजीती नाही पुढे होणार ।
असे सतशील लोक चुनणार,
तरिच रामराज्य तुम्ही करणार ! हो, जी0।।४।।
घ्या पुसा स्वत: हृद्यासी कोण गावासी
चालविल न्याय-तोल धरूनी?
आजवरि केले काय   त्यांनी ?
भल्यासचि द्या मत उचलोनी,
दान   द्या    सत्पात्रा    बघुनी ! हो,   जी0।।७।।
बहू मोलाच हे मतदान, सोडूनी भान,
देउ नका दारू पिणाऱ्यासी । 
लांचखाऊ चोरबाजाऱ्यासी ।
अन्यायी   गुंड   दंडेल्यासी ।
कराल  देशाची   सत्यानाशी ! हो, जी0।।६।।
धुंदीत जाउनी कुणी, मते देऊनी,
पश्चातापास प्राप्त होणार ।
करू नका तसा कुणी व्यवहार ।
असो मग प्रजा किंवा सरकार ।
कानि घ्या तुकड्याची पुकार ! हो, जी0।।७।।