लेकरासी दोष देवुनिया काय

(चाल; अभंगाची) 

लेकरासी दोष देवुनिया काय ।
दोषी  आहे  मायबाप   त्याचे ।।धृ0।।
मायबापा तरी कैसे कळे ज्ञान ।
धर्मांचे शिक्षण  कोण   देतो ? ।।१।।
धर्म तरी चाले सत्तेच्या मार्फती ।
आज त्यांची स्थिती स्पष्ट आहे ।।२।।
समाजाचे बळ तुटले, भंगले ।
स्वार्थापायी    झाले  दास   सारे ।।३।।
अन्न नाही पोटी, सुकल्या विहीरी ।
मेळ      घरोघरी,    दुरावला    ।।४।।
साधुसंत पंथ घेवोनी बैसले ।
लक्ष कोणी भले   घालीची   ना ।।५।।
निराशा, उदासी भय पोटापाठी ।
जनता सगळी कष्टी झाली नाही ।।६।।
तुकड्यादास म्हणे धर्माचे अंकुर ।
सत्याविण    सारे    वाया    जाते ।।७।।