थोरांचे ते जन्म झाले याजसाठी
थोरांचे ते जन्म झाले याजसाठी ।
पाडाया परिपाठी जनलोकां ॥धृ॥
साधुसंत देव याचसाठी येती ।
अनाथा तारिती सुमार्गाने ॥1॥
तयावीण गती नाही आम्हा कोणी ।
प्रभुच्या चिंतनी लागावया ॥2॥
तुकड्यादास म्हणे उपकारासाठी ।
येती या कपाटी मृत्यलोकी ॥3॥