तुझे सगुण रुपडे बघुनिया

(चाल: भला जन्म हा तुला लाभला...)
तुझे सगुण रुपडे बघुनिया, मनास वाटे मजा ।
होय हे विकार सगळे वजा ॥धृ०।।
अगा सगुण सुंदरा ! बुध्दिच्या वरा ! प्रगटला भला ।
दाविसी गुणार्णवाची कला ।।
रिध्दिसिध्दी लोळती, झाडती तुझी कमल-पाउले ।
नाम तव गाता योगी डूले॥
भला सुखाचा कंद, सदा आनंद दाविसी तया ।
धरी जो प्रेम तुझ्या नामी या ।।
(अंतरा) चहु-वेद पुराणे भाट होउनी उभे ।
सांगती स्तुती तव भक्त-जनांच्या सभे ।
ते तुझी शक्ति घेउनी बोलती जिभे ।
धन्य धन्य सद्गुरुराजया ! टाळिसि त्यांची सजा ।
नाम जे गाति फुटुनि काळजा ।।१॥
चरण-कमल स्पर्शता, कराने चुकेल कर-बद्धता ।
होय मुक्तिच्या सुखा रांगता ।।
धरिता क्षणभर ध्यान तयाचे, नयेचि मग मागुता ।
पाहता होय स्वरुप-साम्यता ।।
मृदू शरीर सर्वही, शोभती सप्तचक्र साजिरे ।
लक्ष पुरविता प्रगटती बरे ।।
दिव्य नेत्र लखलखाट दिसती, कर्ण-नाक चिरचिरे ।
केश ते कुरळ शोभती बरे ।।
(अंतरा) नग्नांग तनू, स्वच्छता शरीरावरी ।
लल्लाटि गंध परिपूर्ण दिसे केशरी ।
शोभली फुलांची माळा हृदयावरी ।
सहजासनि बैसला, पाहता वाटे ओढी गुजा ।
फडकती दिसे दुवारी ध्वजा ।।२।।
भवाब्धि-भवतारका ! कृपाळा ! ठाव देइ पाडसा ।
लोटवी निज प्रेमाच्या रसा ।।
धन-दारा-सुत-मान पसारा, तुझ्याविणे श्रीगुरु !
काय मी घेउनि याचे करू ? ।।
वेदशास्त्रसंपन्न, जरी जाहली पुस्तकाबळे ।
तरी अनुभवी-बीज ना कळे ।
आसन सुखसाधना साधूनी काय प्रभु तो कळे ?
कळे पण क्रिया तशी ना वळे ।।
(अंतरा) लोटिला सर्व संसार तुझ्या पाउली ।
धाव गे धाव तू भक्तांची माउली ।
हो प्रसन्न जैसी प्रेमे पान्हावली ।
नको पाहू मम अंत दयाळा ! चुकवी माझी कजा ।
उजळवी निज-प्रेमाची ध्वजा ॥३l।
भक्तजना सुखि करावयासी आला गा ! भूवरी ।
निरंतर नित्य सत्य कलिवरी ।।
निश्चय धरिता तुझ्या पाउली जन्म-मरण ते हरी ।
क्षणी अपुलेसे भक्ता करी ।।
सद्गुरुनाथा ! तुजवाचुनिया नसे सगी सोयरी ।
सर्व हे दिसती असती अरी ।।
तुझे ध्यान सोडुनी भटकले किती वनवनांतरी ।
भोगती चौर्यांशी कोठरी ।
(अंतरा) दे असा वरचि आपुल्या बालका पुरा ।
ना विसर पडे तुज स्मरावया गुरुवरा ।
तुकड्यास ठाव दे अपुल्या चरणी बरा ।
अगाध कीर्ती ऐकुनि स्वामी ! वाढे भक्ति-ध्वजा ।
मिळे मग भव-भ्रांतीसी रजा ।।४।।