तोचि खरा अधिकारि

(चालः रे जरा ! आत बघ जरा..)
तोचि खरा अधिकारि, भक्तिचा झरा राहि ज्या घटी ।
नाहि तरि शब्दज्ञान - चावटी ॥धृ०॥
अंतर - प्रेमा निश्चयि ज्याचा भक्तिविना नावडे ।
साहतो सुख - दुःख साकडे ।।
भला-बुरा कधि शब्द निघेना, द्वेष कधी नावडे ।
आवडे एक सगुण रुपडे ।।
निर्भय अंतःकरण, उदासी वृत्ति स्वरुपी जडे ।
खरा प्रेमभाव हृदयी चढे ॥
नच लाज कुणाची एकावाचुनी मनी ।
नच स्तुती कुणाची एकावाचुनी मनी ।
नच आस कुणाची एकावाचुनि मनी ।
नाशिवंत-इच्छा नच उरली, मानपान खटपटी ।। नाहि० ॥१॥
काम क्रोध-मद-मत्सर सारे, लोळति प्रभुच्या पदी ।
धेर्य ज्या तरावया भव - नदी ॥
कर्म-वासना, योग-साधना, पळती अधिच्या अधी ।
साक्षिपण येई शरिरामधी ।।
नच कवणाशी फार बोलणे, बोले कधिच्या कधी ।
न गवसे शब्दवाद जो वदी ॥
नच कुठे पाहिला कार्य-कर्म साधता ।
इहलोकि, तशी परलोकी   वैराग्यता ।
कधि शब्द काढिना झाले ते मागुता ।
नि:संशयि राहणी जयाची, वास घटी, परघटी।। नाहि0 ।।२|।
वाटे अंतरि क्षमाशीलता, दया देहि या मनी ।
फेरतो सूक्ष्म नाम - मालिनी ।।
स्थीर कुठे नच राहि कधी, जो चंचल वाटे जनी ।
प्रगटला चैतन्यी-चिन्मणी ॥
स्वतंत्र राहणी, अंतरि पाहणी, ऊर्ध्व दृष्टि धावणी ।
लखलखे जैसा भानू जनी ।।
ही मार्ग - गती ज्या नरा साधली गड्या !
तो धन्य धन्य म्हणवितो जगी बापुड्या !
हे सहज स्वभाविक नियम घडे ज्या खड्या ।
तुकड्यादासा तोचि आवडे, दृढ कर्माचा हटी ।। नाहि०।।३॥