तळमळतो हा जीव गड्या ! मम, दीन गोधन पाहुनी ।

(चालः धन्य धन्य गे ! स्फूर्ति तन्मये...)
तळमळतो हा जीव गड्या ! मम, दीन गोधन पाहुनी ।
स्वस्थ राहतो मनीच्या मनी ।।धृ०॥
पुढे पाहु तव पाय उठेना, द्रव्याने अडविला ।
जगाला दिसतो जरि मी भला ।।
दुःख वाटते अंतरि, सखया ! सांगु कुणाला तरी ? ।
जाति जव गायी कसाबा - घरी ।।
(अंतरा) हिंदूच पुढे, मागे, बघ त्या गायिच्या ।
घेउनी काठि उरि मारी जणु आईच्या ।
पोटात न चारा दिसे जरा मज तिच्या ।
काळकरंटे लोक कसाबा, देति गायी नेउनी ।
दया ना जरा   तयांचे   मनी ॥१।।
टकमक बघती हिंदू आमुचे, जे गायी पूजिती ।
देव्हारी मूर्ति करुनि बसविती ।
गंध-अक्षता वाहति घरामधि दगडाच्या मूर्तिला ।
न चारा देति जरा गायिला ।।
कोणि न म्हणती- का नेता रे ! विकावया गायिला ? ।
आपल्या दोन देति जोडिला ॥
(अंतरा) चढओढ किंमती घेती मागुनि घरी ।
मग विका कुठेही कसाब हो वा   अरी ।
करणे न अम्हा सांगती,कापल्या  जरी ।
पहा पहा हा हिंदू गाढव, पाप करी हौसिने ।
चुके का नर्क भोगल्याविणे ? ॥२॥
गळ्यात माळा, टिळा कपाळा, भक्त विष्णुचा भला ।
प्राण गायिचे विकू लागला ।।
गोपाळच की गऊ - काळ हा ? काहि कळेना मला ।
व्यर्थ भारती जन्म पावला ।।
धर्म धर्म म्हणवुनी मिरवितो, धर्म कळेना जरा ।
बुडाला खल स्वार्थाध्ये पुरा ।।
(अंतरा) मौजेचा पुतळा मौज उडवितो कशी ?।
जाणतो धर्म, परि लाज नसे थोडिशी ।
व्यसनात होऊनी गुंग, विकी गायिसी ।
अशा नरा का जन्म दिला, प्रभु ! या भारत-भूवनी ? ।
न बुध्दी जरा तयाला कुणी ।।३।।
बघा गडे हो ! हिंदु असा जरि, व्हा सेवक गायिचे ।
फिटे तरि पांग मात्र आईचे ।।
संत, महंतहि, देव-ऋषी-मुनि हिच्या कृपेने खरे ।
पावले अधिकारासी पुरे ।।
विसरु नका कधि गोरक्षेला, करा तातडी खरी ।
तरिच हा हिंदु राहि भूवरी ।।
(अंतरा) बा ! नका विकू गायिला कसाबा-घरी ।
पाळाच हौसिने प्रेम धरुनि अंतरी ।
जरि कष्ट पडे तरि सहन करा हो शिरी ।
तुकड्यादास म्हणे निववा मज, हीन, दीन म्हणवुनी ।
आचरा घरोघरी ही म्हणी ॥४॥