तार कसा नयनी घुसला ?
(चालः जमुना तट राम खेले..)
तार कसा नयनी घुसला ? हा तार कसा ? ।।धृ०।।
न विरे विरणे, न उरे उरणे, मी पाही, तो पाहि मला ।।१।।
मसुरापासुनि ब्रह्मांडावरि, एकचि एक जसा रचिला ॥२॥
त्यातचि प्रकटे, त्यातचि आटे, त्यातचि हासुनिया हसला ।।३।।
मौन दिसे, कधि शून्यचि भासे कधि भानू बिजली गमला ॥४।।
धार अखंडित, दृश्यचि खंडित, जैसा खेळ मनी विरला ॥५॥
स्वस्थचि राहता, काहि न पाहता, भासे अग्नी-रंग भला ।।६।।
रंग नसे तो, स्वांगचि जाणा, वेडाया मजला टपला ॥७॥
तुकड्यादासा वेड तयाचे, अपुल्या खेळी खेळे भला ॥८॥