सद्गुरुची निज कृपा व्हावया

(चालः पतीतपावन नाम ऐकुनी..)
सद्गुरुची निज कृपा व्हावया, फिरते मन माझे ।
काय करु साधना ? कुणावर घालू मी ओझे ?।।धृ०ll
शास्त्रे बघता शोध मिळेना, भिन्न मते  त्यांची ।
देव भजू की गुरु भजावा ? मनि शंका जाची ।।१॥
काय करावे कर्म   तरी, हे    सांगेना   कोणी ।
अपुले अपुले सर्वच वदती, गुंग  होत   वाणी ॥२॥
सत् संगतिचा लाभ घ्यावया, भटके जिव माझा ।
आड येति षडरिपू, मिरविती विषयाचा वाजा ।।३॥
हृदय बावरे चंचल झाले, स्थीर जरा नाही ।
उपाय सद्गुरुवाचुनि आता न पडे  मज  ठाई ॥४।।
सर्व - साक्षि सद्गुरु ! तुम्हा का लागे   सांगावे ?
तुकड्यादासा भाव जाणुनी उचित प्रेम   द्यावे ॥५॥