गुरुकृपा व्हावया मार्ग मज

(चाल: पतीतपावन नाम..)
गुरुकृपा व्हावया मार्ग मज दावियला   गुरुनी ।
सत्कृत्याविण राहु नको मज सांगितले  त्यांनी ॥धृ०l।
स्त्री-लंपट पुरुषाचे मुखही, पाहु नको डोळा ।
सत्कर्माविण म्हणे रिति कधी, खोउ नको वेळा ॥१॥
ब्रह्मचर्य साधुनी रहावे, निश्चय   धरि   हाची ।
म्हणे, दीनदुबळे दुःखीजन सेवा   कर   त्यांची ॥२॥
नीतीने धन जोड म्हणे, कर सेवा राष्ट्राची ।
मान-पान सोड रे ! म्हणे, हर भाव  नीच  उंची ॥३॥
उपकाराविण जाऊ नये क्षण मंत्र दिला त्यांनी ।
तुकड्यादास म्हणे या मार्गा, विसरु नये कोणी ॥४॥