किति गोड तुझी मुरली कान्हा ?
(चालः जोगन खोजन निकली है..)
किति गोड तुझी मुरली कान्हा ? चितचोर तुझी मुरली कान्हा ! ॥धृ०।।
एेकुनि गोपी तन्मय होती, त्या मुरलीच्या नादाने ।
काहि सुचेना कामधाम मग, सुध हरली हरिच्या ध्याने।।१।।
मंजुळ ध्वनि हा ऐकुनि गायी धावुनि येती एकसरे ।
टकमक पाहती यमुनेकाठी, खानपान सगळे विसरे ।।२ ।।
वाजिव रे प्रभु ! वाजिव रे ! गोपाळ सदा म्हणती वदनी ।
प्रफुल्ल होती प्रेमभराने, नाचति अपुलाल्या सदनी ॥३॥
तुकड्यादास म्हणे उद्धरले, गोपिगोप त्या समयाला ।
एक वेळ तरि मिळेल का हो ! मनमोहन मुरलीवाला ? ।।४॥