लगभाग निघे महालातुनिया, सुकुमार झणीं रघुनाथ वनी

(चालः आशक मस्त फकीर हुआ...)
लगभाग निघे महालातुनिया, सुकुमार झणीं रघुनाथ वनी ।।धृ०।।
अति कोमल अंग मनोहर ते,जणु वृक्षि गुलाब - फुले फुलते ।
जन घाबरले बघताहि तिघे, रडु कोसळले सकलांसि मनी ॥१।।
अति नम्रपणे रघुनाथ वदे,वनराज अम्हा बहुधा सुख दे ।
घरि येउ अम्ही तुमच्या वरदे, विधिचे लिहिले चुकते न कुणी ॥२॥
सवे लक्षमणादि सीता मिळुनी, पदि लागति आई पित्यास झणी ।
आज्ञा द्या तात अम्हास वनी,नच दुःख कधी ठेवाचि मनी ।।३॥
करणेचि अम्हा बहु कार्य तिथे,समजावित मातृ-मना अपुल्या ।
उचले करि चाप नरेश रघू, बघतो एकदा सकला नयनी ॥४॥
करि श्रेष्ठ मुनीस प्रणाम शिरे, हळु पाऊल टाकति तीन हिरे ।
तुकड्या म्हणे सर्व दुखी जनता, पाहती रघुराज-पदा लवुनी ।।५॥