विश्व-चालकाच्या सदनी, काय उणे पामराशी ?
(चाल: गोकुळिचा कान्हा माझा..)
विश्व-चालकाच्या सदनी, काय उणे पामराशी ?
याद ना करी जो त्याची, तोचि राहतो उपाशी ।।धृ०।।
निर्मिली ही वृक्ष-वेली, सागर गिरी सृष्टी सगळी !
पशू-पक्षि क्रिडती रानी, खेळती जीवाजिवाशी ॥१॥
सृष्टि सौंदर्याने भरली, उदासिया सारी सरली ।
गावया कवीसी उरली, एक एक वस्तू खासी ।।२।।
गुण-कर्मे चारी खाणी, बुद्धि हे सजातिय वाणी ।
सुख दुःख भोगिति कोणी, मागच्या फळे कर्मासी।।३॥
जो जसे भजे प्रभुराया, तो तशी फळे दे खाया ।
अजब ईश्वराची माया, पुरलि जीव - जंतू यासी ॥४॥
पहायास ज्ञानी जाती, ब्रह्मफळे सगळी पाहती ।
विषय-सेवकांना दिसती, भिन्न जीव हे तयासी ।।५।l
कोण जाणि त्याची माया ? वेद मौनला गुण गाया ।
लागतसे तुकड्या पाया, भक्ति दे प्रभू ! आम्हासी ॥६॥