गमेना राघवा ! काही, उदासी वृत्तिला आली
(चालः अगर है ग्यान को पाना..)
गमेना राघवा ! काही, उदासी वृत्तिला आली ?
जगावे की मरावे ही, फिकिर मन्मानसी झाली ? ॥धृ० ॥
जगाचा हाल बघताना, जिवाला चैन ना वाटे ।
मिळेना अन्न कोणाला कुणाचा ना कुणी वाली ॥१॥
न श्रद्धा भावही कोठे, न ज्ञानी भेटती कोणी ।
स्वारथी लोक हे सारे, बरळती बोलणी खाली ।।२॥
न दिसते वीर-बल कोठे, न एका धेर्य कोणाला ।
कुणी झळके कधी काळी, न जाती त्याचिया चाली ।।३ ॥
मिळेना एक एकाशी, पुसे मग कोण कोणाला ?
बिघडला मार्ग जनतेचा, सुचेना काहि वनमाळी ! ॥४॥
न पृथ्वी धान्य दे मोठे, न पाणी वाहते काली ।
हजारो लोक भूकंपी, रगडती धातुच्या ज्वाली ।।५॥
सांग बा, सांग ! तुकड्याला, करु कैसी तुझी सेवा ?
सुचेना राघवा ! आता दीनाचा तूच रे ! वाली ॥६l।