कुठे आनंद मानावा ?
(चाल: अगर है ग्यान को पाना)
कुठे आनंद मानावा ? जिथे स्वानंद चाले हो !
ऋषी-साधू वसे जेथे, तपे होती स्वदाने हो ॥धृ०॥
हजारो यज्ञ नेमाने, हरीचे स्मरण प्रेमाने ।
करी गंगेत जो स्नाने, मनी ना थोर साने हो ।।१॥
जगाच्या सर्व विरहीत, असे ज्याचे निजी चित्त ।
सदा अपरोक्ष-घोषात, समाधी सहज पावे हो ।।२॥
म्हणे तुकड्या असा साधू, तयासी कासया बोधू ?
जिथे कल्पांति ना वादू, सदा अद्वेत राहे हो ।।३॥