तोचि खरा अनुरागी

(चालः हे राष्ट्ररूपिणी गंगे..)
तोचि खरा अनुरागी, निःस्पृह, वास करी सत्-संगी ॥धृ०।।
परद्रव्यास्तव नेत्रि आंधळा, परनिंदे मुख - रोगी ।
पर-लक्ष्मी भोगण्या नपुंसक, आत्मसुखाचा रंगी ।।१।।
मंत्रतंत्रि पांगळा, साधना साधाया भव भंगी ।
उदास वृत्ती न  ढळे   नेमी,   दुर्व्यसनाचा  त्यागी ।।२।।
दुर्गुण त्यागुनि, सद्गुरु भजनी, रतला सुस्वर जंगी ।
प्रेमझरा अंतरिचा   ओढी,   निजानंदि   अडभंगी ।।३॥
नच परक्याचा हेवा, निशिदिनि स्थीर रुपाने वागी ।
सुखदुःखासी समान जाणे, अपुल्या स्मरणी जागी ।।४l।
चिलिम, तमाखू, गांजा, व्यसने, दूर करी नच भोगी ।
मानपान, सोडूनी वैभवा, साहि  पिशाच्या   सोंगी ।।५।।
श्र्देचा बलवंत लढव्या, स्मरणाचा     उद्योगी ।
अंतरइच्छा नष्ट   जयाची, मेला    असुनी   जागी ।।६।।
अंतरी निर्मळ, वाचा प्रेमळ, अंगि भक्तिबळ जंगी ।
तुकड्यादासा आस तयाची, पदी  तयाच्या   वागी ॥७।।