कोणि नसे रे वाली, सखया !
(चालः अवचित आली वेळा बाई...)
कोणि नसे रे वाली, सखया ! हो जागृत, उघडी डोळा ।
का निजला भय घेउनि माथा ? भज,भज,त्या निज घननीळा ॥धृ०॥
धन-दौलत पाहुनी, पाहुणे, जमले स्वार्थचि साधाया ।
अंती कोण कुणाचा वाली ? तूच तुझा मग भोगाया ।।१ ॥
बहिण-जावई, विहीण-व्याही, करतिल घाई काढाया ।
पुत्रादिक हे पाणि न पाजिती, म्हणतिल धन-धन रे सखया ! ॥२॥
पैसा-पैसा करुनी करशिल, चोरांची सगळी दाटी ।
नेइल यम तो बांधुनिया तुज, घर राहिल एका वाटी ॥३॥
सोड कामनापाश भवाचा, का भुलला ? पारधि गाठी ।
हरिण जसे तळमळे शेवटी, गति होईल. तैसी मोठी ॥४॥
तुकड्यादास म्हणे मज नलगे, हाव तूचि ही घे सारी ।
काय कुणाचे नेशिल बापा ! भय अंती होइल भारी ॥५॥