श्री सदगुरूने नवल दाविले

(चाल:अवचित आली वेळा बाई...)
श्री सदगुरूने नवल दाविले, न पाहवे मज डोळा रे ! ।
डोळियावाचुनि दृश्य प्रगटले, ऊंच दाविला माळा  रे ! ।| धृ०।।
कर्णावाचुनि शब्द ऐकिंले, सोहं मंत्र उमाळा रे ! ।
अगम-निगम, श्रृति-वेदविधी हे, गाती ज्या प्रतिपाळा रे ! ।|१।।
नेत्रावाचुनि दृश्य प्रगटले, किति सांगू तो सोहळा रे ! ।
अनहद शब्दी गजर संचला, झगमग ज्योत उजाळा  रे ! ।।२।।
त्रिकुट शिखरि एक बाग दाविला,रत्न-वृक्ष,वड-डाळा रे ! ।
तुकड्यादासा दासपणाची, भुलली    वेळ   अवेळा  रे ! ।।३॥