घे प्याला, घे प्याला सखया !
(चालः अवचित आली वेळा बाई..)
घे प्याला, घे प्याला सखया ! हो स्वरुपी मतवाला रे ! ।
स्वरुपावाचुनि न दिसे काही, होशि सदा खुशियाला रे ! ।।धृ०।।
पंचतत्त्व - काचेची चाडी, सतरावीचा झेला रे ! ।
त्रिकुट अंबरी बिंदु मिळाले, पीता मरणी मेला रे ! ।।१।।
मेल्यावर जग काहि दिसेना,चहूकडे उजियाला रे !।
ब्रह्मरंध्र- दरबार उघडला,झालि नशा अलबेला रे ! ॥२।।
ओहं सोहं शब्द मुराले, शून्य शिखरि या खेला रे ! ।
औटपीठ श्रीहाटावरि मग, पश्चिम द्वारि उदेला रे ! ॥३॥
दश नादांचा गजर संचरे, पाहता पाहणी मेला रे ! ।
तुकड्यादासहि जेथे ठेला, तेथचि मुरुनि गेला रे ! ॥४॥