काय हे सजवीति बंड

(चाल: क्यों नहीं देते हो दर्शन..)
काय हे सजवीति बंड, ज्ञान लोका सांगण्यासी ? ।।धृ०।।
फार वाचोनी पुराणे, जगति   झालेती   शहाणे ।
अनुभवाला कोण जाणे ? आत त्यांची वृत्ति कैसी ।।१॥
धर्म माझाची खरा हो ! म्हणुनि याला या धरा हो ! ।
सांगण्यास कृत्य ना हो, अंति जातिल क्रूर  फासी ।।२॥
वादवादा करुनि चोख, चढुनि गर्वा मानि तोख ।
ना कुणाचा ठेवि धाक, बोलि वदती  शूक   जैसी ।।३।l
विजयपत्रे घेउनीया, खूश होती, मानि    राया ।
अन्य त्याविण का उपाया ? तुकड्या म्हणे त्या अज्ञवासी ।।४।।