कशी निष्ठूरता धरली, हरी ! तुज का न ये पान्हा ?
(चालः अगर है ग्यान को पाना..)
कशी निष्ठूरता धरली, हरी ! तुज का न ये पान्हा ?
अती निच जाहलो त्राता ! सोड जाणोनिया तान्हा ।।धृ०।।
बहू छळले गृही दारी, न कोणी आज आधारी ।
न ये गुण पाच ते हारी, का न येई तुला करुणा ? ।।१।।
बहु हसती जगी लोक, मला पाहूनि सकळीक ।
हणे मांडीयला शोक, मिळेना खावया अन्न ॥२।।
तुझीया श्रीकृपादाने, बहू तरलेत स्मरणाने ।
बोध निज अंगि मम बाणे,म्हणे तुकड्या करी दाना ।।३॥