काय पुण्य रे ! तव उदया येई ?

(चाल: अरे हरि प्यालो..)
काय पुण्य रे ! तव उदया येई ?
पातला अमोल   नर - कायी ॥धृ०।।
धन्य तव भाग्य, सर्वहि भोगाया, घरिच ठेविले आणुनीया ।
तुझे स्वाधीन, केले तिज राया ! उघड नेत्रासि शोध काया ।
उलट होउनी, पाहि अजब माया, वर वरी असे क्षणिक छाया ।
शोध घेउनी, सदगुरु - गुण गाई ॥ पातला0।।१।।
एक पंडीत, नित्य करी भजन, एकविस सहस्त्र गुरुनाम ।
जपे दिनरात, नित चाले नेम, तयासी नसे दुजे काम ।
अक्षरे दोन, नीरंजन-धाम, समाधी सहजचि आराम ।
सौख्य भोगितो, खुण गुरुविण नाही ।।पातला0।।२।।
मध्य भागास, संग त्रिवेणीचा, सरस्वति-यमुना-गंगेचा ।
मेळ जाहला, जीवनकळी साचा, उतरतो मेळा संतांचा ।
तया स्थानास, कुंड अमृताचा, भक्तिरुप घुटका प्रेमाचा ।
धन्य राहती, स्थिर हो गुरु - पायी ॥ पातला० ।।३।।
मस्त राहती, अलक्ष-मुद्रेत, न ऐके कवणाची मात ।
राग-रागिणी, संत एक वदन, मृदंग विणा घोर धरत ।
पाहि बा ! तुझे, अन्य रुप नाही, तूचि अविनाशि वस्तु पाही ।
काढि मैलास, तुकड्या  दे  ग्वाही ।। पातला0।।४।।