त्राहि त्राहि जिव हा देवी !
(चाल: चल ऊठ भारता आता ...)
त्राहि त्राहि जिव हा देवी ! जगदंबे ! दृष्टी फिरवी IIधृ॥
वय हे गेले सत्राचे ।
झाले तुकडे धैर्याचे ।
बोल गे ! अजुनि तरी वाचे ।
मस्तक तव चरणी ठेवी । जगदंबे ! दृष्टी फिरवी l।१।।
फिरविले काम-क्रोधांनी ।
राहिलो अजुन अज्ञानी I
विषयीच अंग-मन-वाणी ।
पाडशील का भव गोवी ? जगदंबे ! दृष्टी फिरवी ।l२।।
तारिले भक्त भव-पूरी ।
का निष्ठुर गे । अंतरी ?
बालक तुझा दुराचारी ।
पतिताला कासे लावी l जगदंबे ! दृष्टी फिरवी ।।३॥
मायबाप पदरी न धरी I
मज कोण तुझ्याविण तारी ?
करि गे ! व्याघ्रावर स्वारी ।
तुकड्यादासाला तरवी । जगदंबे ! दृष्टी फिरवी ।l४।।