हनुमंत भक्तराया ! मी शरण तुला
(चाल -सहज मी आंधळा गा...)
हनुमंत भक्तराया ! मी शरण तुला आलो ।
त्रासुनि भवी त्राता ! तव चरणी लीन झालो ।
करि कृपा अता सखया ! कामक्रोधी मी बुडालो ।।धृ०।।
नेणवे मला काही, ते ब्रह्मज्ञान तुमचे ।
वर्णु काय कीर्ति हो ! या अल्पमती वाचे:
करि करि कृपा अता, ध्वज लाविन नामाचे ॥१॥
अवतरलासी सखया ! बा अंजनीचे पोटी ।
पाळोनि ब्रह्मचर्या, धरिलासे राम कंठी ।
तव महिमा ऐकुनिया, मम कंठ आजि दाटी ।।२॥
सागरी सेतु बांधी, शोधिसी सीतेलागी ।
रक्षिला बिभीषण तो, भेटवी राम वेगी ।
जाळिली सर्व लंका, लावुनिया तिज आगी ।।३॥
चरणांकित तुकड्या तो तुज शरण खरा आला ।
दे ठाव अता सखया ! चौऱ्यांशी- भोग झाला ।
उध्दरी सहज चरणी, दे नामामृत - प्याला ।।४॥