करुणा करि, श्री स्वामी दत्ता
(चाल: लागी प्रभू ! तव छंद...)
करुणा करि, श्री स्वामी दत्ता ! करुणा करि ।।धृo॥
दंड - कमंडलु, पायि खडावा ।
रुद्राक्षमाला, टिळकहि बरवा !
निरंजन प्रभु तू जगत्राता । करूणा करि ॥१।।
त्रिविधहि तापे त्रस्तचि झालो !
कामक्रोधे बहु मी पिडलो ।
येई अत्रि - सुता रे ! आता । करुणा करि ।।२।।
गो - श्वानांचा मेळा जमवुनि ।
काखे झोळी, शंखहि रमवुनि ।
त्रिशुल-चक्र घेउनिया हाता। करुणा करि ।।३॥
वर्णु काय गुण ? वेदहि शिणले ।
सहा-अठरा जण यांची न चाले ।
तुकड्यादासा घे निज हाता । करुणा करि ।।४॥