सुधर रे गड्या ! जन्म अता अपुला
(चालः अरे हरि प्यालो..)
सुधर रे गड्या ! जन्म अता अपुला ।
काळ टपुनिया जवळ बसला ।।धृ0।।
क्षणिक हे सुख, का बघुनी भ्रमशी ? शेवटी देइल यम फासी ।
शोध अंतरी, का जन्मा येशी ? येउनी सूकरवत होशी ।
काय कारणे, तुज खटपट ऐसी ? व्यर्थचि फिरशी चौऱ्यांशी ।
सोड ही बला, धरि-गुरु-चरणाला ।। काळ0 ।|१।।
मित्र गणगोत, मात-पिता-दारा, स्वप्नसम जाणि नसे थारा ।
या योनीत, भ्रमला जग सारा, पुढे का नरदेही वारा ।
त्वरित लागतो ? चौऱ्यांशी-फेरा, फिरुनिया आला कुविचारा ।
तरी ना तुज मार्ग कसा दिसला ? ।। काळ०॥२।।
हीच नरतनू, मिटवाया जन्म, म्हणुनि स्मर श्रीगुरुचे नाम ।
कनक-कांतेशी, ना ठेवी प्रेम, हृदयि धर तो श्री रघुराम ।
चुकवि जन्मास, तोडुनिया मरण, करिल भवसागरि तो तरण ।
द्वैत-बुध्दीचा, वास ठेवि दुरला ।। काळ0 ।।३।।
घेई गुरुकृपा, कलियुगिचे सार, काढि हा मैलाचा भार ।
धीर धरवेना, ना ये सुविचार, करी तुकड्याला जगपार ।
स्वामि माझिया ! घे चरणी मजला ।। काळ०।।४।।