तव स्वरुपाचा ध्यास लागता, मग कैची व्याधी ?
(चाल: कसा निभवशी काळ..)
तव स्वरुपाचा ध्यास लागता, मग कैची व्याधी ?
भवबंधन हे जाय तुटोनी, काळ न कधि बाधी ॥धृ०l।
मन-बुद्धीचा होउनि साक्षी, पाहता निज संधी ।
जागृति-स्वप्न-सुषुप्तीमाजी, निजरुप ते नांदी ॥१॥
तोडुनिया ती भिन्न उपाधी, पाहता निज-ज्योति ।
निश्चल निर्मल स्वरुपचि प्रगटे, बंधनेहि जळती ॥२॥
अखंड सत्चित्सुख-आनंदी, राही मन-वाणी ।
नित्यमुक्त मी झालो ऐसे, जाणतसे ज्ञानी ॥३॥
तुकड्यादास सांगतसे गुज, सत्संगति साधी ।
ऐशा स्थितिला विरळा जाणे, धर गुरुपद आधी।।४॥