वाटते बहू या जनी, कधी हो मनी, श्रीहरी पाही

(चालः हे नरा ! आत बघ जरा...)
वाटते बहू या जनी, कधी हो मनी, श्रीहरी पाही ? ।
बा ! नये तयाला करुणा मम लवलाही ।।धृ०॥
भक्तास बहुत तारिले, शत्रु मारिले, सृष्टिचे वरी ।
मी एक दुष्ट म्हणुनिया कृपा ना करी ।।
नच दिसे कुठे ही सार, बहू भडिमार, ग्रंथ-ग्रंथीचे ।
भावना खरचुनि बा ! गेलि, वदो का वाचे ? ।।
भटकलो जन्म-मरणात, नसे बा ! अंत, दिशाला दाही ।
बा ! नये तयाला करुणा0 ।।१।।
तो कसा जगाचा पिता, असुनि पाळिता, दीन पाही ना ?
की हतभाग्ये आमुच्या तया धकवेना ? ।।
आधार नसे दुसरा, विना त्या हरा, शोध काढा हो ! ।
जिव-शीव कसे पांगले ? ऐक्य जोडा हो ! ।।
यश-गंध नसे जी ! जरा, होत घाबरा, यया मायेन ।
लागली मनाला चिंता, न मिळे अन्न ।।
नच संत-चरण पाहिले, रुप ध्याइले, गुरुचे काही ।
बा ! नये तयाला करुणा0।।२।।
विषयात धुंद राहनी, त्रासलो मनी, काय करु आता ? ।
वाटते प्राण हा द्यावा जी जगत्राता ! ॥
नित पैशासाठी कसा, जाहलो पिसा, जात परदारी ।
पाहतो अंत तो  किती सखा पुतनारी ? ।।
मम प्राण दाटला हरि ! होत मर-मरी का नये पान्हा ? ।
तो तुकड्या बालक म्हणे जानकी-रमणा ! ।।
भटकलो दारदारात, न ऐके मात, कुणीही काही ।
बा ! नये  तयाला  करुणा 0।।३।।