दिसू दे रुप तव देवा !
(चाल: अगर है ग्यानको पाना..)
दिसू दे रुप तव देवा ! आस नेत्रास ही भारी ।
आडवा काढ पट आता, मधीचा भेद संहारी ।।धृ।।
विटेवरि तू उभा राहे, ठेवुनीया कटी कर हे ।
सावळे सगुण रुप धर हे, लागु दे एकदा तारी ।।१।।
गळ्यामधि तुळसिच्या माळी, केशरी तिलक हा भाळी ।
कुंडलाची प्रभा सगळी, रमु दे ध्यान गिरिधारी ! ll२॥
रुप अनुपम्य अति झळके, भक्तगण मारती हाके ।
पाहसी त्यासि कौतूके, बघू दे एकदा नेत्री ।।३।।
हणे तुकड्या नको वेळा, घाल ही भीख वेल्हाळा !
न हाती जाऊ दे काळा, उभा झालों तुझे दारी l।४॥