सदगुरुचे द्वय पाय सोडुनी
(चालः उठा गड्या ! अरुणोदय..)
सदगुरुचे द्वय पाय सोडुनी, व्यर्थचि देही का भ्रमसी ?॥धृ ०॥
उगाच प्राणायाम करुनिया, का मरतो बा ! उपवासी ?
सकल जगाचा पालनकर्ता असोनिया रे ! तुजपाशी ।।१॥
करिशिल अट्ठावीस पाठ जरि, योगाभ्यासहि पूर्ण करी ।
नच जाशिल गुरु-चरणी धावत, तर चौर्यांशी पाणि भरी ।।२।।
गुरुविण तरला कोण असे तो ? दावी मनुजा ! मजपाशी ।
करुनि खटपट अंग बोडुनी, व्यर्थ बनसि का संन्याशी ? ॥३॥
अपुली कीर्ती व्हावी म्हणूनी बनसी क्षणिकचि विन्यासी ।
द्वैत सुटेना गर्व धरोनी संता शरण न जव जासी ।।४॥
अमृत नव्हे रे ! सत्य जाण बा ! जाई गुरुचे चरणासी ।
तुकड्या बोले सर्व तीर्थ ते, पंढरि अधिक गया, काशी l।५॥