कशासाठी तिरथधाम ? गुरु दावील तो नेम ।

(चाल : मनाला स्थीर करवाया...)
कशासाठी तिरथधाम ? गुरु दावील तो नेम ।
कुणी या की कुणी जा हो ! नसे चरणाविना काम ॥धृ॥
कुणी करिती पठन गीता, तयासी त्यातची ब्रह्म l
अम्हाला  वाटते   हेची, गुरु   तो   देव   निजधाम ।।१॥
कुणी पंचाग्नि मिरविती, जटा दाढी   बहू   रीती ।
जयाला ज्यात  आनंद,   तयाने   घ्यावे   ते   नाम ।।२॥
कुणी म्हणती विदेही  मी म्हणुनिया नग्नची फिरती ।
करूनिया आस देहाची, फसे का तो   घनश्याम ? ॥३॥
करू मी कोणता नेम ? न होई एकही काही ।
म्हणे तुकड्या धरु चरणा, मिळे त्यातुनि   हे   प्रेम ॥४॥