घे आजचि साधन बा ! करुनी
(चाल: सकळ कळे हे का न कळे.)
घे आजचि साधन बा ! करुनी ॥धृ०॥
आत्मज्ञानाविण ते काही । सर्वचि साधन लटके पाही ॥
लोळ लोळ रे ! गुरु - चरणी ।l१।।
जो नर प्रथमचि श्रध्दा ठेवी । गुरु वाक्यहि विश्वासे सेवी,
होईल तो आत्मज्ञानी ।।२॥
सोपे सांडुनि का फिरसी वन ? लक्ष्यालक्ष्यी ठेवी रे ! मन ।I
जा गुरुपासुनि घे पुसुनी ॥३॥
बहु संताची अनेकहि मते । खोटे नसती रे खचितचि ते ।।
राजयोग हा मानि मनी ॥४॥
तुकड्या बोले ऐक सत्य तू । खरा न्याय हा, गुरु-शिष्य तू ॥
ॐ तत्सत् ते. पाहि मनी ॥५॥