श्री सदगुरुचे पाय धरी रे ! तोचि भवी तरतो

(चाल: कसा निभवसी काळ..)
श्री सदगुरुचे पाय धरी रे ! तोचि भवी तरतो ।
होउनिया निर्लज्ज भवी रे ! पद गुरुचे  धरितो ॥धृ०॥
मायबाप गणगोत सर्वही, जरि छळिती मजला ।
होउनिया पदि वहाण गुरुची, लीनपणा  धरला ॥१॥
वर्णिति श्रृतिही महिमा त्याची , अपार जगतात ।
रजतमसत्वहि त्रिगुण जाणा ,चरणी लीन होत ।।२।।
ध्यानि मनी जागृती , सदगुरु - चरण जया भासे ।
होउनिया मग कृपा तयाची,  उध्दरती   सरिसे  ॥३॥
अंकित तुकड्या दास गुरुचा , लीन पदी झाला ।
दावि चरण गा ! त्वरित मला तू , प्राणचि घाबरला ॥४ ॥