विसरुनिया स्वरूपाला , प्रेमे जीव कसा फसला ?
(चाल: पतित पावन नाम ऐकू...)
विसरुनिया स्वरूपाला , प्रेमे जीव कसा फसला ?
सिध्द जरी तो असला तरि हो ! साधकपणि बुडला ॥धृ०॥
मायेचे ते घुंगाट सर्वहि पडले स्वशरीरी |।
तेणेकरुनी गोते खातो , बनतो आविचारी ॥१॥
कोण कोठुनी आलो मी ? जव हाचि शोध केला ।
सो : हं शब्दे पार निघालो, शरण सदगुरूला ।।२।।
नको जगाचे मायिक प्रेमहि , भ्रमवी चित्ताला ।
अंकित तुकड्या दास गुरुचा, चरणाब्जी रतला ॥३॥