घातली सदगुरुने मोहनी
(चाल: कधि येशिल मनमोहना.. )
घातली सदगुरुने मोहनी । सोडले संसारावर पाणी ॥धृ॥
आनंद करिन त्रैभुवनी ।
बसेन दसवे महाली जाउनी ।
चार नारी मागे सोडुनी ।
सेवेसी उभी पाचवी राणी । सोडले संसारा 0 ।।१।।
सात रत्ने करी घेउनी ।
उच्चारिन अजपा वाणी ।
ऐकोनि अनाहत ध्वनी ।
राहिन दंग अपुल्या स्थानी । सोडले संसारा ० ।।२।।
पिंड-ब्रह्मांड पाणी भरी ।
राज्य एकविस स्वर्गावरी ।
सत्रावीवर करुनी स्वारी ।
केला पांडुरंग तो धनी । सोडले संसारा 0।।३।।
आता झालो मीहि उदास ।
धरली पुतनारीची कास ।
जरि का झाला हो ! निर्वंश ।
तरि धरीन बळकट मनी । सोडले संसारा 0 ।।४।।
म्हणे उध्दव श्रीकृष्णाला ।
पाजा अजपाचा मज प्याला।
नाहितर जन्म व्यर्थचि गेला ।
म्हणे तुकड्या, तो मोक्षदानी । सोडले संसारा ।।५।