जडले प्रेम, तुटला नेम, अंगी भरली निशा
(चाल: कभी आर, कभी पार लगे...)
जडले प्रेम, तुटला नेम, अंगी भरली निशा ।
हरले देहाचे भान, खुलल्या दाही दिशा ।।धृ०l।
धरता पाऊल तुझ्या मंदिराच्या सामोरी ।
पडला प्रकाश जीवा लागलीसे माधुरी ।
डोळा भरुनी पाहता तुजला, तन्मय होण्या जीव धावला,
जैसा वेडा - पिसा ।।१॥
वाजती नगारे - भेरी, चौघडे - तुतारिया ।
पुष्पांचा वर्षाव होतो, देवाच्या दरबारी या ।
मनमोहन पाहतांना नयनी, दूमदूमले मन उल्हासानी,
आली आली उषा ।।२।।
मोरमुकुट कुंडलांची, प्रभा जैसी फाकली ।
श्यामसुंदर - दर्शनासी, वृत्ति गुंगू लागली ।
तुकङ्यादासा प्रसंग ऐसा, अघटित घडला अनुभव तैसा,
कुणा सांगू कसा ? ।।३॥