गुरुदेवाचा अंतरवीणा, अनहदी मी ऐकला
(चालः गळ्यात माझ्या तूच जिवलगा...)
गुरुदेवाचा अंतरवीणा, अनहदी मी ऐकला ।
ओऽहं सोऽहं नाद घेउनी, मधुर अती वाजला ।।धृ०।।
नाद - बिंदुले प्रगट जाहले, अंतर - नयनावरी ।
गोल गोल हे अग्निचक्रही, प्रसन्न मन ते करी ।।
सहजसमाधी निजस्वरुपाची, घेण्या जीव आर्तला ।
तूचि साक्षी दिव्यदर्शनी, हाच वेणु ऐकला ।।१।।
गगन भेदूनी प्रकाश पडला, कोटि सूर्य प्रगटले ।
पहता नयनी नयन विसरले, सूर्यरुप जाहले ।।
तुकड्यादासा गुरु- शिष्य हा, भेदभाव विसरला ।
तू -मी एकचि सर्व व्यापला, अनुभव-गड गवसला ।।२।।