लावाया झेंडा भुवरी । अवतरले श्री गिरिधारी
( चाल : राजहंस माझा निजला ...)
लावाया झेंडा भुवरी । अवतरले श्री गिरिधारी ॥
ऐका हो । सावध चित्ते । श्रेातेही आणिक वक्ते ।।
द्या श्रवण मनाने पुरते । लीला दावियली संते।।
वरखेड नामे गावात ।
झाले आइकुजी संत ।
लाविला न कोणी अंत ।
चमत्कार गमले भारी । अवतरले श्री गिरिधारी ।।१।।
वय चौसष्ट वर्षांचे । आले वरखेडी साचे ॥
नेत्र दीप्त अनुतापाचे । बोलती कुणाशि न वाचे ॥
चैतन्यामाजी नाचे । काढि उमाळे प्रेमाचे ॥
वाटे जनास आनंद ।
पाहुनिया तो स्थानंद ।
ना घेइ कुणाचा फंद ।
कितिकांचे दुःख निवारी I अवतरले श्री गिरिधारी ।।२॥
स्थिती विरक्त ऐसी ज्याची । नच पर्वा निज देहाची ।।
बाहेरि नग्नसे रूप । अंतरी ब्रह्म - तद्रुप ॥
वर्ण काय गुण ते वाचे ! चलती न बोल वेदाचे ॥
जे आत्मज्ञानी पूर्ण ।
अप्रमाण नाही वचन ।
प्रत्यक्ष दाविती खुण ।
पाहताचि भव - भय हारी । अवतरले श्री गिरिघारी ।।३॥
पाहनिया मूर्ति जनांनी बसविली स्थळी स्थापोनी ॥
रात्रंदिन हरिगुण - गानी । आनंद न माये गगनी ।।
निज सौख्य भरे प्रेमाने। ते वेळी कोणि न जाणे ।
स्मरणही करीता ज्याचे ।
जळताति दोष जन्माचे ।
उल्हासी जन ते साचे ।
दर्शने सुखी नरनारी । अवतरले श्री गिरिधारी ।।४॥
बुधवाऱ्या दिवशी जाण। करिती स्वामीचे स्नान ।।
धूपारति ओवाळून । करिती श्रीगुरुचे भजन ।।
ते पदकमलीचे चिन्ह। स्पष्ट दिसे हो ध्वज - पद्म ।।
तनु फारच हो मउ शोभे ।
शिरि कुरळ केश - तोरंबे ।
देह नग्न ऐसा राबे I
गुंडाळी नखे ती सारी । अवतरले श्री गिरिधारी l।५।।
पुढे फारच वृध्दपणानी । नच उठवे जागेहूनी ।।
भरले नेत्र अपरोक्षाने । जेवि बाळ दिसते तान्हे ||
कुणि या की जा हो बरवे । ओळखी अंतरी सर्वे ।
कुणि धावत जाउनि भेटी ।
उठविती फिरायासाठी |
देह जगी केला कष्टी I
गोजिरी मुर्ति सुखकारी। अवतरले श्री गिरिधारी ।।६॥
द्वारकेत कृष्णचि आले । जन तेवी हर्षित झाले ।।
इतुका ये आनंद मनी । त्यजु काय प्राण हे चरणी ।।
हरिकथेत दिन तै जाई । देहभान घरचे नाही ।।
भाग्यवान धन्यचि भूमि ।
आले आडकुजी स्वामी ।
तन-मन-धन लावू कामी ।
यापुढे काय संसारी ? अवतरले श्री गिरिधारी lI७॥
की इंद्रासनही न्यून । धरिताचि गुरुचे चरण।।
मंडपी स्वरुप ते फाके । काळही थरथरे धाके ।।
प्रत्येक भोजना आणी । जेविति जरि आले भानी ।।
जातिचे असुनि कासार ।
वश केला तो हरिहर ।
गेले सायुज्यापार I
रिध्दि सिध्दी लोळति द्वारी । अवतरले श्री गिरिधारी ।।८॥
शोभा ती पाहनि सोपी । उध्दरती जेथे पापी ॥
तुकड्यादास लागे चरणा । मागतो हेचि , घे करुणा ॥
षड़विकार तोडुनि माझे । जन्ममरण चुकवी ओझे ।।
शास्त्रे नच केली पठन ।
हरिभक्ति न केली श्रवण ।
बा!धरिला मान - अपमान ।
तूच एक मम कैवारी । अवतरले श्री गिरिधारी ।।९।।
बालक मी बहु अज्ञानी । चुकि सुधारावि सुज्ञांनी ! ॥
क्षमा करी आडकुजी स्वामी ! पतिताला पावन तुम्ही ।।
जरि पातकि तुमचा बाळ । परि नामि करी कल्लोळ ।।
ठाव देई अपुल्या पायी ।
कामना दुजी ना काही ।
म्हणे तुकड्या सद्गुरु आई !
तुम्ही मोक्षाचे अधिकारी । अवतरले श्री गिरिधारी ॥१०॥